विजया किरमिरवार यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार

लोक बिरादरी शाळेत कार्यरत

भामरागड : तालुक्यातील हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रमशाळेतील उपक्रमशील शिक्षिका विजया शरद किरमिरवार यांना अत्यंत मानाचा समजला जाणारा डॉक्टर कुमुद बंसल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सेंटर व शिक्षण विकास मंचद्वारा देण्यात येणारा हा पुरस्कार मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे खा.सुप्रिया सुळे, एमकेसीएलचे प्रमुख विवेक सावंत व माजी संचालक वसंत काळपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

विजया किरमिरवार या मागील 10 वर्षांपासून पद्मश्री डॉक्टर प्रकाश व मंदाकिनी आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या लोकबिरादरी आश्रमशाळा हेमलकसा येथे कार्यरत आहे. त्या सध्या गणित विषय शिकवतात. गणित विषयाला प्रात्यक्षिक स्वरूप देऊन ज्ञानरचनावादाच्या आधारे ते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात. यामध्ये खरी कमाई, बाजाराचे प्रात्यक्षिक, प्रत्यक्ष मापन, गणित शब्दकोडे, गणितीय मॉडल तयार करणे, याशिवाय विविध उपक्रम राबवतात.

या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून साडेचारशेच्या वर नामांकन आले होते. त्यातून महिला प्रवर्गातून एकमेव विजया किरमिरवार यांची निवड करण्यात आली हे विशेष. या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, पुस्तके आणि 21 हजार रुपये रोख असे आहे. त्यांनी या पुरस्काराचे श्रेय त्यांचे मार्गदर्शक अनिकेत आमटे आणि समीक्षा आमटे, तसेच लोक बिरादरी आश्रमशाळेच्या सर्व चमुला दिले आहे.

पुरस्कार वितरणाच्या वेळी बसंती रॉय, दत्ता बाळसरात, माधव सूर्यवंशी, चव्हाण सेंटरचे शिक्षण विभाग प्रमुख योगेश कुदळे, चव्हाण सेंटर आणि शिक्षण विकास मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.