गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आज गडचिरोलीत निघणार महिला रॅली

महिलांच्या ढोलताशा पथकाचे आकर्षण

गडचिरोली : दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा, म्हणजेच हिंदू नववर्षाचे स्वागत महिलांच्या वतीने भव्य पैदल रॅलीने केले जाणार आहे. महिला पथकाच्या ढोलताशाच्या गजरात आणि पारंपरिक वेशभुषेत निघणारी ही रॅली गडचिरोलीकरांसाठी आकर्षण ठरणार आहे.

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच 29 मार्च 2025 रोजी शनिवारला संध्याकाळी 4 वाजता साई मंदिर (चामोर्शी रोड) येथून निघणाऱ्या या रॅलीत महिला नऊवारी साडी, फेटा, नथ अशा पारंपरिक मराठमोळ्या
वेशभूषेत दिसणार आहे. विशेष म्हणजे रॅलीच्या पुढे चालणारे ढोलताशाचे पथकही महिलांचेच राहणार आहे.

ही रॅली इंदिरा चौक, स्टेट बँक, बी-फॅशन प्लाझा मॅाल, हनुमान मंदिर, सपना क्लॅाथ, त्रिमूर्ती चौक, इंदिरा चौक आणि चामोर्शी मार्गावरील राधे बिल्डिंगजवळ रॅलीचा समारोप होईल.

गडचिरोली शहरातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने या रॅलीत सहभागी होऊन हिंदू आणि मराठी नववर्षाचे जल्लोषाने स्वागत करावे, असे आवाहन रॅलीच्या संयोजिका गीता हिंगे, तसेच सहसंयोजिका सुनीता साळवे, सीमा कन्नमवार, मिनल हेमके, दिप्ती वैद्य, योगिता दशमुखे यांनी केले आहे.