प्रत्येक तालुक्यातील एक हजार युवतींना मिळणार स्वरक्षणाचे धडे

महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न

गडचिरोली : अलीकळील काळात महिला व मुलींसोबत होत असलेल्या क्रुर हिंसाचारासारख्या घटनांना आळा बसावे, मुलींना आपले संरक्षण करता यावे यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रत्येक तालुक्यात एक हजार मुली व महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 15 ते 25 वयोगटातील युवतींना राजमाता जिजाऊ युवती स्वरक्षण प्रशिक्षण या नावाने हे तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली व विद्यार्थी निधी ट्रस्ट, तसेच ऑल इंडिया थागता असोशिएशन आणि गोंडवाना विद्यापीठ, शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने 10 जुलै रोजी गडचिरोलीच्या जिल्हा परिषद हायस्कूल येथे जिल्ह्यातील पहिल्या जिजाऊ युवती स्वरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आभासी पद्धतीने महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॅा.देवराव होळी होते.

सदर कार्यक्रमाला महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनीही आभासी पद्धतीने उपस्थित राहून मार्गदर्शनृ केले. यावेळी सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेशकुमार वाघ, सहायक पोलीस निरीक्षक रूपाली पाटील, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर, बाल विकास प्रकल्प अधिकारी नारायण परांडे, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, संरक्षण अधिकारी रूपाली काळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, संजय मुरकुटे, विद्याभारती कन्या हायस्कूलच्या शिक्षिका पुनम आभारे उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला वसंत विद्यालय, विद्याभारती हायस्कूल, शिवाजी हायस्कुल विज्ञान कनिष्ठ महाविदयालय, जि.प.हायस्कूल, राणी दुर्गावती कन्या हायस्कूल, महिला महाविद्यालय आदी शाळा-महाविद्यालयातील जवळपास 1200 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. त्यांना महिला व मुलींवरील हिंसाचार संकल्पना व सद्यस्थिती, तंत्रज्ञान, महिला व मुलींना असलेले धोके या विषयांवर सायबर गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.