गडचिरोली : राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके आज (दि.23) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. दिवसभर त्यांचा भरगट्ट कार्यक्रम राहणार आहे. त्यात प्रामुख्याने धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय आश्रमशाळेला भेट आणि विद्यार्थी-पालक मेळाव्याला तसेच आदिवासी योजनांच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्याला उपस्थिती, आणि आरमोरी येथे आयोजित गोटुल महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
ना.उईके यांचे सकाळी 10 वाजता गडचिरोलीच्या शासकीय विश्रामगृहात आगमन होईल. सकाळी 11 वाजेपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी, आदिवासी विद्यार्थी संघटना, वसतिगृहातील मुले/मुली व प्रतिनिधी यांच्यासाठी राखीव राहील. 11 वाजता सोडे येथील आदिवासी विकास विभागातील लाभार्थ्यांशी संवाद मेळाव्यास शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळा येथे उपस्थित राहतील. दुपारी 2.30 वाजता आरमोरी येथे गोटुल महोत्सव व सांस्कृतिक कला, क्रीडा स्पर्धा, आदिवासी समाज प्रबोधन मार्गदर्शन शिबिरास उपस्थिती, सायंकाळी 4 वाजता आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथे जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व प्रकल्प कार्यालय व आदिवासी विकास, शबरी विकास महामंडळाचा आढावा ते घेतील. सायंकाळी 6 वाजता आदिवासी विभागाच्या विविध संस्था व मुलींच्या वसतिगृहास भेट देऊन रात्री 8 वाजता यवतमाळकडे रवाना होतील.
सोडे येथील कार्यक्रमाला ना.उईके यांच्यासोबत प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ.नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.मिलींद नरोटे, आ.रामदास मसराम , माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ.देवराव होळी, सोडेच्या सरपंच पूनम किरंगे, आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे (भाप्रसे), जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा(भाप्रसे) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास आदिवासी पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मीना (भाप्रसे) यांनी केले आहे.