गडचिरोली : देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवार दि.५ जुलै रोजी गडचिरोलीत येणार आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीत जिल्ह्यात येणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा बंदोबस्तासाठी तब्बल दिड हजार पोलीस अधिकारी व अंमलदारांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेला एक हजार आसनक्षमतेचा सभामंडप वातानुकूलित राहणार आहे. विद्यापीठ मार्गावरील रस्त्यांचे युद्धपातळीवर नव्याने डांबरीकरणही करण्यात आले.
सकाळी 10.30 ते 11.30 अशा अवघ्या एक तासाच्या या दौऱ्यात राष्ट्रपती गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. तेथूनच त्या अडपल्ली-गोगाव येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिलेचे रिमोट कंट्रोलने अनावरण करतील. राष्ट्रपतींसाठी खास पुणे येथून दोन बुलेटप्रुफ गाड्या गडचिरोलीत दाखल झाल्या आहेत. हेलिपॅड ते कार्यक्रम स्थळापर्यंत आणण्यासाठी राष्ट्रपतींच्या ताफ्यात 35 वर वाहने राहतील. त्यात वैद्यकीय पथक, बाईल जॅमरचाही समावेश असेल.
दौऱ्याच्या बंदोबस्तात 151 पोलीस अधिकारी, 639 पुरुष व महिला अंमलदार, 8 एसआरपीएफ प्लाटुन, 11 सी-60 पथके, वायरलेस, मोटार परिवहन विभाग व ईतर असे मिळून 1500 अधिकारी/अंमलदार तैनात राहतील.
वाहतूक व्यवस्थेत बदल
राष्ट्रपतींच्या या दौऱ्यानिमित्त कोटगल टी-पॉईंट ते कोर्ट टी-पॉईंट हा मार्ग सामान्य नागरीकांना दिनांक ५ च्या पहाटे 5 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत रहदारीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी सूचना पोलीस विभागाने केली आहे. गोंडवाना विद्यापीठातील कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय टी-पॉईंट येथील खुल्या मैदानात केली आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या (व्हीव्हीआयपी) वाहनांची सोय मृदा संवर्धन कार्यालय या ठिकाणी करण्यात आली आहे.