राज्यस्तरीय शुटिंग स्पर्धेत महेश ठावरेंना पाचवे स्थान

गडचिरोली : हळूहळू सर्वच क्षेत्रात प्रगती करत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तरुणाने नेमबाजी या क्रीडा प्रकारात राज्यस्तरावर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. दि. 1 ते 5 जून 2023 या कालावधीत आयोजित 26 व्या महाराष्ट्र राज्य शुटिंग स्पर्धेत महेश ठावरे यांनी 10 मीटर एअर रायफल पुरुष गटात पाचवे स्थान पटकाविले आहे.

सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील महेश ठावरे यांनी नेमबाजी या क्रीडा प्रकारात मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ठावरे यांनी मिळविलेल्या यशाचे नेमबाजीसारख्या जिल्ह्याला नवीन असलेल्या क्रीडा प्रकाराला उत्तेजन मिळेल. त्यासाठी जिल्ह्यातील खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची इच्छाही त्यांनी दर्शवली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील तरुण विविध शासकीय नोकऱ्यांकरिता तयारी करतात. प्रत्येक विभागात खेळाडूंकरिता राखीव जागा असतात. अशावेळी एखाद्या खेळात प्राविण्य प्राप्त करून शासकीय नोकरी मिळविता येते, असे मत महेश ठावरे यांनी व्यक्त केले. नेमबाजी या क्रीडा प्रकाराच्या प्रशिक्षणाची सोय गडचिरोली जिल्ह्यात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. महेश ठावरे यांनी होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे. ठावरे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, भाऊ व गुरुजनांना दिले.