गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या दृष्टिने महत्वाच्या असलेल्या मागण्यांसाठी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे सरचिटणीस अशोक नेते यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तीन निवेदन सादर केले. त्यावर निश्चितपणे सकारात्मक विचार करण्याची ग्वाही राष्ट्रपतींनी दिली.
पहिल्या निवेदनात वनसंवर्धन कायदा 1980 मध्ये सुधारणा करून वनजमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वनपट्टे देण्यासाठी ३ पिढ्यांची अट शिथिल करावी, अशी महत्वपूर्ण मागणी केली. गडचिरोली, गोंदिया तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वनालगत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मागणी महत्वाची आहे. या अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना पट्टे मिळण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे तीन पिढ्यांची अट शिथिल केल्यास अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.
दुसरी महत्वाची मागणी ओबीसी जनगणनेसंदर्भात करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी समाजाच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी ओबीसी आयोगाची स्थापना केली. परंतू त्याचा हेतू साध्य करण्यासाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी खा.नेते यांनी केली.
तिसऱ्या मागणीत उद्योगांना चालना देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात उद्योजकांना टॅक्स हॅालिडे पॅकेज घोषित करण्याचा आग्रह धरण्यात आला. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र मागास असल्यामुळे या भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, विविध प्रकारच्या खनिज संपत्तीवर आधारित प्रक्रिया उद्योगातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी उद्योजकांना आकर्षित करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना टॅक्समध्ये सूट देणारे पॅकेज जाहीर करावे, अशा महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन खा.नेते यांनी दिले.
राष्ट्रपतींना भावले रुषालीने रेखाटलेले पोर्ट्रेट
मुलचेरा तालुक्यातील रुषाली उईके हिने पेंटिंगमधून रेखाटलेले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे चित्र राष्ट्रपतींच्या गडचिरोली दौऱ्यात त्यांना भेट देण्यात आले. रुषालीची ही ईच्छा पूर्ण करण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी पुढाकार घेतला. यामुळे रुषालीसह तिच्या पालकांनी खा.नेते यांचे आभार व्यक्त केले. विशेष म्हणजे रुषालीने रेखाटलेले हे चित्र राष्ट्रपतींनाही आवडले.