दोन संशयितांकडून पोलिसांनी जप्त केले नक्षलवाद्यांचे 27 लाख रुपये

दोन हजारांच्या नोटांचाही समावेश, अहेरीत नाकाबंदी करून कारवाई

पकडलेल्या दोन आरोपींसह कारवाई करणारे पथक

गडचिरोली : पोलीस विभागाच्या विशेष अभियान पथकाने अहेरी येथे बुधवारी नाकाबंदी करून दोन इसमांकडून तब्बल 27 लाख 62 हजार रुपये जप्त केले. ही रक्कम नक्षलवाद्यांची असल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे. विशेष म्हणजे त्यात 2 हजार रुपयांच्या 607 नोटा (12 लाख 14 हजार रुपये) होत्या. त्यामुळे त्या नोटा बँकेत बदलवून घेण्यासाठी पाठविल्या जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

भारत सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, 30 सप्टेंबर 2023 नंतर 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. त्यामुळे नागरिक सध्या 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर माओवादी बेकायदेशीररित्या जमवलेले पैसे लोकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणाहून बदलवून घेत आहेत. बऱ्याच ठिकाणी माओवाद्यांच्या या रक्कमा जप्त केल्या गेल्या आहेत. बुधवार दि.5 जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाच्या जवानांची अहेरी येथे नाकाबंदी केली होती. त्या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या 2 संशयित इसमांकडून 27 लाख 62 हजार रुपये जप्त करण्यात आले.

त्या संशयिय इसमांमध्ये रोहीत मंगु कोरसा (24 वर्ष), रा.बोर ता.एटापल्ली आणि बिप्लब गितीश सिकदार (२४ वर्ष), रा.पानावर जि. कांकेर (छत्तीसगड) यांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या रक्कमेबाबत विचारपूस केली असता ते गोंधळले. ती रक्कम कुठून आणली, कशाची आहे याचे योग्य उत्तर त्यांना देता आले नाही. अधिक चौकशीत ती रक्कम नक्षलवाद्यांची असल्याची माहिती पुढे आले. त्यातील 2 हजार रुपयांच्या नोटा बदलविण्यासाठी दिल्या गेल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, तसेच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

नागरिकांनी सतर्क राहावे
माओवादी जनतेच्या हितासाठी कधीच लढले नाहीत, त्यांचा लढा हा फक्त पैशासाठी, सत्ता गाजविण्यासाठी, गरीब आदिवासींची पिळवणुक करण्यासाठीच चालत आला आहे. वेगवेगळ्या ठेकेदारांकडून खंडणीच्या माध्यमातून गोळा केलेला पैसा त्यांनी कधीच जनतेच्या विकासासाठी हितासाठी वापरला नाही. माओवाद्यांनी हा पैसा फक्त भारत सरकार विरुद्ध देशविघातक कृत्ये करण्यासाठी व स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला आहे. त्यामुळे माओवाद्यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडू नका व कोणी बेकायदेशीरपणे 2 हजार रुपयांच्या नोटा बदलविण्यासाठी देत असतील तर जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमके यांच्याशी संपर्क करा, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.