विशेष कृती दलातील पोलीस जवानाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

रोड ओपनिंग करतानाची घटना

गडचिरोली : कियार ते आलामपल्ली मार्गावर रोड ओपनिंग अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी पथकासोबत गेलेले विशेष कृती दलाचे पोलीस जवान रवीश मधुमटके (34 वर्ष) यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.

भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रापासून 5 किलोमीटर चालल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे प्राथमिक मत डॉक्टरांनी व्यक्त केले. त्यांचा अंत्यविधी गुरूवारी गडचिरोली येथे करण्यात आला.