गडचिरोली : देशातील अनेक नक्षलग्रस्त राज्यांच्या तुलनेत छत्तीसगड राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांनी सर्वाधिक जाळे पसरवून अनेक गावं काबिज केली आहेत. पण नक्षलवाद्यांचे हे नेटवर्क मोडीत काढण्यासाठी आता नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या सुरक्षा यंत्रणांनी गेल्या चार महिन्यांपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांची मोठी कोंडी होत आहे. गुरूवारी पुन्हा बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये जवळपास 30 नक्षलवादी मारले गेले आहेत. गेल्या दिड महिन्यात छत्तीसगडमध्ये विविध चकमकींमध्ये 100 पेक्षा जास्त नक्षलवादी मारले गेले आहेत, हे विशेष.
देशातून नक्षलवाद संपविण्यासंदर्भात अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यानुसार रणनिती आखली जात आहे. गेल्या पाच वर्षात गडचिरोली पोलिसांनी नक्षलविरोधी अभियानात आक्रमक पवित्रा घेतला. त्याचवेळी गावकऱ्यांना नक्षलवादापासून दूर ठेवण्यात ते यशस्वी झाले. एवढेच नाही तर नक्षल्यांचा गड असणाऱ्या छत्तीसगड सीमेकडील भागात दोन वर्षात 5 पोलीस स्टेशनची उभारणी केली. त्यामुळे नक्षलवाद्यांना तिकडून इकडे येण्याचा मार्गही सोपा राहिलेला नाही. अशा स्थितीत नक्षलवाद्यांच्या गडाला सुरूंग लावण्यात सुरक्षा यंत्रणांना आता खऱ्या अर्थाने यश येत असल्याचे दिसून येत आहे.
छत्तीसगडमध्ये राजनांदगाव, कांकेर, नारायणपूर, बिजापूर या गडचिरोली-गोंदिया जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांसह सुकमा, दंतेवाडा, कोंडागाव, बस्तर या जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. शस्रास्र निर्मितीच्या कारखान्यासह नक्षलींना प्रशिक्षण देण्याचे काम याच भागात केले जाते. या भागात सुरक्षा यंत्रणेच्या अनेक जवानांना नक्षली हल्ल्यात बळी पडावे लागले. पण आता सुरक्षा यंत्रणांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने छत्तीसगडमध्येही चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे.
गुरूवारच्या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले. दुपारपर्यंत 22 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले होते. मात्र सायंकाळी ती संख्या 30 पर्यंत गेल्याचे समजते.