भामरागड : नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जी-37 बटालियनकडून तालुक्यातील कोठी परिसरातील नागरिकांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. नागरी कृती कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या या कार्यक्रमात नागरिकांना शिक्षणाचे महत्व सांगून सद्भावना जागृत करण्यात आली.
या कार्यक्रमात सौर दिवे, ओपन टॉप राउंड प्लास्टिक कंटेनर (100 लिटर), क्रीडा साहित्य (कॉस्को व्हॉलीबॉल, व्हॉलीबॉल नेट, क्रिकेट बॅट व बॉल, स्टंप) तसेच मॅन्युअल भात थ्रेशर मशीनचेही वाटप कंपनी कमांडर अविनाश चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गावकऱ्यांमध्ये सुरक्षा दल आणि देशाप्रती सद्भावना निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कंपनी कमांडर चौधरी यांनी नागरिकांना संबोधित करताना, केंद्रीय राखीव पोलीस दल नेहमीच तुमच्या पाठीशी उभे आहे. आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी नेहमीच तयार राहू, असे सांगून तरुण वर्गाने कठोर परिश्रम करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी पीएसआय शरद काकळीज, 37 बटालियन सीआरपीएफचे अधिकारी आणि जवान तसेच स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.