गडचिरोली : ट्रिपल सीट जाणाऱ्या युवकांची भरधाव दुचाकी रस्त्यालगतच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात तीनही युवकांना प्राण गमवावे लागले. त्यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. हा अपघात गुरूवारी (दि.17) सकाळी 10 वाजताच्या सुमारास घोट ते आष्टी मार्गावरील ठाकूरनगर जवळच्या पहाडीवर घडला.
मृतांमध्ये सौरभ शुभाशिष चक्रवर्ती (20 वर्ष) आणि साहेब शुभाशिष चक्रवर्ती (16 वर्ष) रा.वसंतपूर या भावंडांसह विशाल भुपाल बच्छाड (19 वर्ष) रा.शिरपूर (तेलंगणा) या तिघांचा समावेश आहे. त्यापैकी दोघे भाऊ घटनास्थळीच तर तिसरा युवक विशाल हा चामोर्शीच्या रुग्णालयात उपचार घेताना दगावला. ही धडक एवढी जोरदार होती की, तिघेही दूरवर फेकल्या गेले आणि दुचाकीने लगेच पेट घेतला. त्यात ती पूर्णपणे जळून खाक झाली.
हे तीनही युवक वसंतपूर येथुन घोटकडे जात असताना ठाकुरनगर पाहडीजवळील वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी एका सागवानाच्या झाडावर जाऊन आदळली. त्यांच्यापैकी कोणीही हेल्मेट घातलेले नव्हते. शिवाय ट्रिपल सीट असल्यामुळे गाडी नियंत्रित करणे शक्य झाले नाही.
या अपघाताची माहिती मिळताच घोट पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश गोहणे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून जखमीला ताबडतोब चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु विशालचा मृत्यू झाला. तीनही युवकांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी चामोशी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितेश गोहणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप सिडाम करीत आहेत.