कर्जबाजारी भाडेकरूच निघाला ‘त्या’ निवृत्त महिला अधिकाऱ्याचा मारेकरी

दागिने घेऊन काढला होता पळ

गडचिरोली : शहराच्या नवेगाव भागात राहणाऱ्या निवृत्त महिला अधिकारी कल्पना केशव उंदीरवाडे यांच्या भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्येमागील गूढ उकलण्यात अखेर पाच दिवसानंतर पोलिसांना यश आले. हा खून दुसऱ्या कोणी केला नसून भाडेकरू म्हणून राहात असलेल्या इसमानेच केल्याचे स्पष्ट झाले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

विशाल ईश्वर वाळके (40 वर्षे) असे त्या आरोपीचे नाव असून तो मूळचा एटापल्ली येथील रहिवासी आहे. सध्या तो मृत कल्पना उंदीरवाडे यांच्या कल्पना विहार, सुयोगनगर, बोरकर पेट्रोलपंपच्या मागे, नवेगाव येथे राहात होता.

दिनांक 13 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 2.30 वाजताच्या दरम्यान कल्पना उंदीरवाडे यांचा त्यांच्या घरीच डोक्यावर जड वस्तूने मारून खून करण्यात आला होता. त्यांचे भाऊ पोलीस उपनिरीक्षक मोहन सोनकुसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. विशेष म्हणजे आरोपीने कोणत्याही स्वरुपाचा पुरावा अथवा दुवा मागे सोडलेला नसल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.

वरिष्ठ अधिका­ऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्रे वेगाने फिरवत आरोपीचा माग काढण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस स्टेश व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदारांची तीन तपास पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी साक्षीदार तसेच इतर पुराव्यांच्या मदतीने संशयित इसम विशाल ईश्वर वाळके याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आज दि.18 एप्रिल रोजी सायंकाळी त्याला अटक करण्यात आली.

कर्ज फेडण्यासाठी चोरले दागिने

आरोपी विशाल वाळके हा कल्पना उंदिरवाडे यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहात होता. यादरम्यान तो कर्ज आणि उसनवारीच्या पैशांमुळे त्रस्त होता. त्यामुळेच त्याने घरमालकाच्या घरात चोरी करण्याची योजना आखली. दि.13 रोजी तो चोरीच्या उद्देशाने घरामध्ये घुसला. पण कल्पना उंदिरवाडे समोर आल्यानंतर त्याने त्यांच्या डोक्यावर शस्त्राने वार त्यांचा खून केला आणि त्यांच्या अंगावरील दागिने घेऊन तेथून पळून गेला.

कोणतेही पुरावे नसताना केवळ तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आणि गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी कोण हे शोधून काढून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, तसेच एसडीपीओ सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली ठाण्याचे पोनि. रेवचंद सिंगनजुडे, स्थागुशाचे पोनि.अरुण फेगडे, सपोनि.भगतसिंग दुलत, सपोनि. राहूल आव्हाड, सपोनि. विजय चव्हाण, पोउपनि. दीपक चव्हाण, पोउपनि. विशाखा म्हेत्रे व अंमलदार यांनी पार पाडली.