देसाईगंज : सिंचनाची सोय असलेल्या देसाईगंज, आरमोरी तालुक्यात उन्हाळी धानाचे पीक हाताशी आले असताना मान्सूनपूर्व पावसाने कहर केला आहे. त्यामुळे शेतात कापून वाळविण्यासाठी ठेवलेला धान पाण्यात भिजून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देसाईगंज तालुक्यात ईटियाडोह प्रकल्पाचे पाणी मिळत असल्याने उन्हाळी धानाचे प्रमाण जास्त आहे. काही दिवसांपूर्वीच मळणी करून अनेक शेतकऱ्यांनी शेतातील धान बांध्यांमध्येच वाळवण्यासाठी ठेवलेला होता. पण तीन दिवसांपासून येत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उन्हाळी धान विकून खरीप हंगामाच्या लागवडीचा खर्च भागवण्यासाठी शेतकरी तयारी करत असताना हे अवकाळी संकट आले आहे. त्यामुळे संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरसकट एकरी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.