गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरसारख्या दुर्गम भागातील दोन घरांमधून पोलिसांनी तब्बल 17 लाखांची देशी दारू जप्त केली. या कारवाईत दारूची वाहतूक करण्यासाठी वापरले जात असलेले चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली तर पळून गेलेल्या तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून झिंगानूर उपपोलीस स्टेशनच्या हद्दीतील झिंगानूर येथे राहणाऱ्या कारे कोरके गावडे (38 वर्ष), याच्या घरावर पोलिसांनी छापा मारला. घराची पंचासमक्ष झडती घेतली असता घरात 90 एम.एल. मापाचे रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीचे 124 खाकी रंगाचे कागदी बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये 100 नग प्रमाणे एकूण 12 हजार 400 नग सिलबंद बॉटल आढळल्या. त्या प्रत्येक बॅाक्सची किंमत 10 हजार रुपये प्रमाणे एकूण 12 लाख 40 हजार रुपये असून तो सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी कारे गावडे याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने सदर देशी दारु ही समया बापू दुर्गम (32 वर्षे) व सडवली बापू दुर्गम (32 वर्ष) रा.झिंगानूर यांची असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या घरी सुद्धा पोलीस पथकाने छापा टाकला. पण पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने दोघेही घटनास्थळावरुन पळून गेले.
पोलिसांनी त्यांच्या घराच्या अंगणामध्ये उभे असलेले चारचाकी महिंद्रा बोलेरो वाहनाची (क्रमांक ए.पी. 15-एम-1088) तपासणी केली असता त्या वाहनामध्ये 90 एम.एल. मापाचे रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीचे 48 खाकी रंगाचे कागदी बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये 100 नग प्रमाणे एकूण 4,800 नग सिलबंद बॉटल (एकूण किंमत 4 लाख 80 हजार रुपये) आणि एक चारचाकी वाहन (अंदाजे किंमत 3 लाख 50 हजार रुपये) असा एकूण 8 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर देशी दारु रुपेश कारेगला (32 वर्ष), रा.देचलीपेठा ता.अहेरी हा पुरवठा करत असल्याची माहिती दिली.
चारचाकी वाहनासह दोन्ही ठिकाणावरून मिळून आलेला एकूण 20 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरुन जप्त करत झिंगानूर पोलीस स्टेशनला चारही आरोपींविरूद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोउपनि.अभिजीत घोरपडे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झिंगानूरचे पोउपनि. अभिजीत घोरपडे व अंमलदार, बामणीचे एएसआय नरेंद्र दुबे, नायक सचिन जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचा येथील हवालदार राजू चव्हाण, चालक हवालदार आनंद खोब्राागडे, अंमलदार नईम शेख यांनी पार पाडली.