एटापल्ली : तपासणी नाक्यावर पोलिसांना पाहून आपल्याजवळील बंदुका आणि दुचाकी वाहन सोडून पळ काढणाऱ्या दोन तरुणांना एटापल्ली पोलिसांनी गुरूवारी अटक केली. त्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध तर नाही ना, अशी शंका सुरूवातीला व्यक्त केली जात होती. परंतू तसा कोणताही संबंध अद्याप आढळला नाही. दरम्यान न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीएेवजी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. ते युवक शिकारीसाठी जात होते, अशी चर्चा परिसरात आहे.
एटापल्ली तालुक्यातील एकरा (खुर्द) येथील रहिवासी असलेले सम्मा गोटा व रेजू गोटा या दोन युवकांना गुरूवारी एटापल्लीकडे येताना तपासणी नाक्यावर पोलिसांनी रोखले. पोलिसांना पाहताच ते आपल्याजवळील भरमार बंदुका आणि दुचाकी वाहन सोडून पळण्याच्या प्रयत्नात होते. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दुचाकीने येत असलेल्या या युवकांजवळ चटईत गुंडाळून दोन भरमार बंदुका होत्या. कसनसूर मार्गावर एटापल्लीपासून काही अंतरावर प्रभारी पोलिस अधिकारी रविराज कांबळे, उपनिरीक्षक संतोष मोरे, उपनिरीक्षक सविता काळे आणि त्यांचे सहकारी नाकेबंदी करुन ये-जा करणाऱ्यांची झडती घेत असतानाच ते युवक पोलिसांच्या हाती लागले.
त्यांच्याकडील चटई उघडून पाहिली असता आतमध्ये दोन बंदुका आढळून आल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. दरम्यान त्या युवकांना शुक्रवारी अहेरी न्यायालयात हजर करण्यात आले. पण त्या युवकांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे ठामपणे सांगता न आल्यामुळे न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
या भागातील लोक शिकारीसाठी आपल्याकडे भरमार बंदुका ठेवतात. अलिकडे वन्यप्राण्यांच्या शिकारीला बराच आळा घालण्यात यश आले असले तरी लपूनछपून शिकार केली जाते. एकदा (खुर्द) येथील ते युवकही शिकारीसाठीच जात होते, पण शिकार करणे गुन्हा असल्यामुळे पोलिसांना पाहून ते घाबरले आणि त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा त्या भागात आहे.