सामाजिक भान ठेवत तिने मूकबधीर विद्यार्थ्यांसोबत साजरा केला वाढदिवस

गडचिरोली : वाढदिवस म्हटला की केक, मित्र-मैत्रिणींचा गराडा आणि धम्माल सेलेब्रेशन याची मुला-मुलींना क्रेझ असते. पण शहरातील शिवाजी हायस्कूलमध्ये दहाव्या वर्गाला शिकणाऱ्या देवयानी मनोहरसिंह पवार या विद्यार्थिनीने सामाजिक भान ठेवत आपला वाढदिवस मूकबधिर विद्यालयातील बाळगोपाळांसोबत साजरा केला.

कोणताही अनावश्यक खर्च न करता पवार कुटुंबाने मूकबधीर विद्यालयातील मुलांच्या आनंदातच आपला आनंद मानून त्यांच्यासोबत आपल्या लाडक्या मुलीचा, अर्थात देवयानीचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. देवयानीलाही हा प्रस्ताव आवडला आणि त्या दिव्यांग मुलांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वाढदिवसाच्या आनंदात सहभागी करून घेण्यात आले.

पवार कुटुंबियांच्या या सामाजिक दायित्वाच्या भावनेचे देवयानीच्या शिक्षकांनीही कौतुक करत तिला आशीर्वाद दिले. यावेळी तिची आजी बेबीबाई, आई-वडील मनोहरसिंह पवार, दीपाली पवार, कीर्ती पवार, योगेश कोडापे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे आणि मसाला भाताचे वाटप करण्यात आले.