कोनसरीत युवतीची तर नैनपुरात युवकाची आत्महत्या

दोघांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट

देसाईगंज/आष्टी : देसाईगंजमधील नैनपूर वॅार्डातील 23 वर्षीय युवकाने गळफास लावून, तर आष्टी येथे एका युवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. (सविस्तर बातमी खाली वाचा)

प्राप्त माहितीनुसार, देसाईगंज शहरातील नैनपूर वार्ड येथील रहिवासी दीपक दत्ताजी चौधरी (23 वर्ष) हा युवक पूर्वी नजिकच्या बैद्यनाथ कंपनीत कामावर होता. मात्र सध्या तो शेतीच करत होता. नेहमीप्रमाणे तो शेतातून घरी परतला. त्यावेळी आई-वडील आणि इतर कुटुंबिय शेतातच असल्याने घरी कोणीही नव्हते. याचदरम्यान त्याने आपल्या घरात गळफास घेतला.

याबाबतची माहिती देसाईगंज पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह खाली उतरवला आणि उत्तरीय तपासणीकरीता ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे पाठविला. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

कोनसरीत युवतीने संपविले जीवन

दुसऱ्या घटनेत आष्टी पोलीस स्टेशनअंतर्गत कोनसरी येथील अंजली राजू खडसे (21 वर्ष) या युवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सोमवारी रात्री अंजली आपल्या घरी झोपी गेली होती. पण सकाळी ती घरात नव्हती. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. सकाळी 10 च्या सुमारास कोनसरी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारातील विहिरीत अंजलीचा मृतदेह सापडला.

प्राप्त माहितीनुसार, अंजलीचा मूल येथील एका युवकाशी विवाह जुळला होता. त्या युवकाशी तिचे सोमवारी रात्री फोनवरून संभाषणही झाले होते. पण अचानक तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यासारखे काय झाले, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आले आहे.

मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल, असे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी सांगितले.