गडचिरोली : राज्य उत्पादन शुल्क विभागाने देसाईगंज तालुक्यातील बोडधा ते रावणवाडी मार्गावर एका कारमधून येत असलेली एक लाखाची देशी दारू आणि तीन लाखांची कार जप्त केली. अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागाचे पथक संशयित वाहनांची तपासणी करत असताना बोडधा ते रावणवाडी मार्गाने येणाऱ्या एका कारला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने बोडधा ते रावणवाडी या कच्च्या मार्गाने जोरात पळ काढला. त्या कारचा पाठलाग करत वाहन क्र.एम.एच. 12, एम.एफ. 1284 (आय-20) रावणवाडी गावाच्या हद्दीत गाठून तपासणी केली असताना त्यात 25 खाकी रंगाच्या खर्ड्याच्या खोक्यांमध्ये देशी दारू टायगर संत्री या ब्रँडच्या 90 मिली मापाच्या प्रत्येकी 100 बॅाटल याप्रमाणे एकूण 25 बॅाक्स देशी दारू (छापील किमतीनुसार एकूण किंमत रुपये 1,00,000), तसेच दारू वाहतुकीकामी वापरण्यात आलेले कार (अंदाजे किंमत रुपये 3,00,000) जप्त करण्यात आली.
सदर गुन्ह्यात आरोपी ऋषीत घनश्याम घुटके रा.कुरुड व महेश लोकचंद उके रा.कोरेगाव, ता.देसाईगंज यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई निरीक्षक एम.एम परांडकर, दुय्यम निरीक्षक सी.व्ही. भगत, भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस.एल. चौधरी, तसेच ए.टी. वैरागडे, वाय.एस. राठोड, एस.आर. सुरजुसे, एस.एन. भोयर आदींनी मिळून केली. पुढील तपास दु.निरीक्षक एस.एल.चौधरी करीत आहेत.
































