गडचिरोली : येथील प्रतिष्ठित काबरा परिवारातील सदस्य सतीश काबरा तसेच प्रथम किसनलाल भय्या यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला. त्यांचे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी “घडी” चिन्हाचे दुपट्टे घालून स्वागत केले.
येथील सर्किट हाऊसमध्ये हा पक्षप्रवेशाचा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक हंगामापूर्वी हा पक्षप्रवेश झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी राजकीय वातावरण पोषक बनले आहे. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, अहेरी तालुकाध्यक्ष नागेश मडावी, जावेद अली, रतन दुर्गे प्रामुख्याने उपस्थित होते.

मागील 10 दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा पालथा घातला. जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची बाजू भक्कम बनली आहे.