गडचिरोली : जिल्ह्यात यावर्षी उशिरा हजेरी लावणारा पाऊस गेल्या तीन दिवसांपासून सतत बरसत आहे. सोमवारी रात्रभर कोसळल्यानंतर मंगळवारी दुपारी पावसाने थोडी उसंत घेतली. मात्र हवामान खात्याने जिल्ह्यात पावसाच्या बाबतीत रेड अलर्ट दिल्याने नागरिकांनी आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, अशी सूचना जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केली आहे. दरम्यान पूरपरिस्थितीमुळे मंगळवारी दिवसभर जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद होते.
सकाळी घेण्यात आलेल्या नोंदीनुसार 24 तासात जिल्ह्यात सरासरी 60.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यात सर्वाधिक 117 मिमी पाऊस मुलचेरा तालुक्यात झाला. गडचिरोली तालुक्यात 53.8 मिमी, कुरखेडा 68.3 मिमी, आरमोरी 40.5 मिमी, चामोर्शी 40.7 मिमी, सिरोंचा 29.4 मिमी, अहेरी 58.8 मिमी, एटापल्ली 95.1 मिमी, धानोरा 77.6 मिमी, कोरची 69.8 मिमी, देसाईगंज 28.5 मिमी आणि भामरागड तालुक्यात 46.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
जिल्हयात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे. नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कता बाळगण्याची सूचना करण्यात आली आहे. भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पहाटेच पाणी चढल्याने १०० पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला. संध्याकाळी पुलावरील पाणी ओसरले असले तरी वाहतूक सुरू झालेली नव्हती.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारपर्यंत खालील रस्त्यांवरील वाहतूक बंद होती. त्यात 1) चातगांव -कारवाफा- पोटेगांव- पावीमुरांडा-घोट राज्यमार्ग (पोहार नदी, पोटेगांव जवळ लोकल नाला, देवापूर जवळील नाला 2) पोटेगाव-राजोली मार्ग बंद (गडचिरोली) 3) चापलवाडा ते चक चापलवाडा (चामोर्शी ) 4) चापलवाडा ते पोतेपली पॅच (चामोर्शी ) 5) चापलवाडा ते मकेपली मार्ग नाल्यावरील पुरामुळे बंद (चामोर्शी 6) कुनघाडा-गिलगांव पोटेगांव रस्ता (पोटेगांव जवळ) 7) तळोधी- आमगांव -एटापल्ली -परसलगोंदी- गट्टा रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी) 8) तळोधी आमगांव एटापल्ली परसलगोंदी गट्टा रस्ता (बांडीया नदी) 9) अहेरी- आलापल्ली -मुलचेरा रस्ता (गोमणी नाला) 10) अहेरी आलापल्ली मुलचेरा घोट रस्ता (कोपरअली जवळील नाला) 11) अहेरी- मोयाबीनपेठा- वटरा रस्ता राज्यमार्ग (वटरा नाला) 12) आलापल्ली- ताडगांव -भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्लकोटा नदी) 13) आलापल्ली -ताडगांव -भामरागड – लाहेरी राष्ट्रीय महामार्ग (गुंडेनुर नाला) व (बिनागुंडा नाला) 14) कसनसुर -एटापल्ली -आलापल्ली रस्ता राज्यमार्ग (करमपल्ली जवळील नाला, एलचिल जवळील नाला) 15) कसनसुर एटापल्ली आलापल्ली रस्ता (एटापल्ली जवळील नाला) 16) आष्टी – गोंडपिपरी- चंद्रपूर (जड वाहतुकीला बंद)