बांडे नदीच्या पुरात वाहून गेली मायनिंग अभियंत्यांची चारचाकी गाडी

गडचिरोली : जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू असताना आणि सर्व नदी-नाल्यांना पूर आलेला असताना पुराच्या पाण्यातून पैलतीर गाठण्याचा प्रयत्न जीवावर बेतण्याची शक्यता आहे. असाच प्रयत्न करणाऱ्या सुरजागड खाणीतील दोन अभियंत्यांचा जीव थोडक्यात बचावला. पण त्यांची जीपगाडी पुराच्या पाण्यात पुलावरून खाली कोसळली.

प्राप्त माहितीनुसार, दोन मायनिंग अभियंते महिंद्रा कॅम्पेर या गाडीतून सुरजागड लोहखाणीकडे जात होते. एटापल्लीजवळील बांडे नदीच्या पुलावरून पाणी वाहात होते. पण चालकाने पुढे काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गाडी पाण्याच्या प्रवाहाने सरकू लागली. त्यामुळे गाडीमधील अभियंत्यांसह चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर उड्या घेतल्या. थोड्याच वेळात त्यांची गाडी पाण्याच्या प्रवाहाने पुलावरून खाली कोसळत वाहात गेली. याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. असे धाडस कोणीही करून आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.