गडचिरोली : जिल्ह्यात होऊ घातलेल्या तलाठी पदाच्या भरतीसाठी गेल्या महिन्यात जाहीरात काढण्यात आली. त्यात तलाठ्यांच्या पेसा क्षेत्रातील १५१ आणि बिगरपेसा क्षेत्रातील ७ अशा एकूण १५८ जागांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र जिल्ह्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तलाठ्यांच्या जागांपैकी २० टक्के जागा अनुकंपा उमेदवारांमधून भरण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे आता १५८ ऐवजी १३८ जागांसाठी तलाठ्यांची पदभरती उमेदवारांमधून केली जाणार आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी संजय मीना यांनी २० जुलै रोजी पदभरतीसंदर्भात सुधारित तक्ता जाहीर केला. त्यानुसार पेसा क्षेत्रात ११४ जागा तर बिगस पेसा क्षेत्रासाठी २४ जागांवर तलाठ्यांची भरती केली जाणार आहे. सामाजिक प्रवर्गनिहाय त्यात वि.जा.अ. प्रवर्गातून २, भ.ज.क. प्रवर्गातून १, इ.मा.व. मधून १५, ई.डब्ल्यू.एस. प्रवर्गातून ६ तर पेसा (अ.ज.) प्रवर्गातून ११४ जागा भरल्या जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.