गडचिरोली : कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबत वेगवेगळ्या व्यवसायात गुंतलेल्या महिलांना स्वतःच्या आवडीनिवडी, छंद जोपासण्यासाठी वेळच देता येत नाही. त्यामुळे त्यांच्यातील प्रतिभा जगापुढे येत नाही. अशा महिलांना त्यांच्यातील नृत्यकौशल्य लोकांसमोर आणण्याची संधी दै.देशोन्नतीच्या मनस्विनी मंचने दिली. त्यासाठी लावणी आणि मंगळागौर स्पर्धेचे आयोजन केले होते. शनिवारी दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत शेकडो महिलांनी सहभाग घेतला.
संध्याकाळी ज्येष्ठ सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या महिला व मुलींना गौरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या मनस्विनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिथी म्हणून गडचिरोलीचे आमदार डॅा.देवराव होळी, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, प्रा.डॅा.नरेंद्र आरेकर यांच्यासह देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा.अनिल धामोडे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन आणि समारोपीय समारंभाला गडचिरोली जिल्ह्याची लेक आणि टिव्हीवरील ‘जिवाची होतिया काहिली’ या मालिकेत मुख्य भूमिका वठविणारी प्रतीक्षा शिवणकर हिची उपस्थिती विशेष आकर्षण होती. यावेळी अनेक महिला, मुलींना प्रतीक्षासोबत फोटो काढून घेण्यासाठी गर्दी केली होती.