गडचिरोली : आदिवासी विकास विभाग नागपूरअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूरच्या वतीने राणी दुर्गावती जयंतीनिमित्त विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर पार पडल्या. या स्पर्धेत व्हॉलीबॉल खेळात गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.

आदिवासी विकास विभाग नागपूरअंतर्गत नागपूर, वर्धा, देवरी, भंडारा, चंद्रपूर, चिमूर व गडचिरोली या 7 प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. व्हॉलीबॉलचे सर्व सामने जिंकून गडचिरोली प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. मागील वर्षापासून आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील खेळाडूंच्या क्रीडा स्पर्धांप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात येत आहेत.
गडचिरोली प्रकल्प संघाकडून सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.प्रभू सादमवार, सतीश पवार, वसीम पठाण, प्रवीण पोटावी, पवन मेश्राम, संतोष कन्नाके, प्रकाश अक्यमवार, सचिन भालेकर, धनंजय कांबडे, रवींद्र गंडे, परमेश्वर केंद्रे, श्रीकांत पाल आदी खेळाडू मैदानात उतरले होते. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांनी गडचिरोली प्रकल्पाच्या संघाचे अभिनंदन केले.

































