गडचिरोली : पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने गडचिरोलीत आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी जाहीर भाषणातून आणि प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांना लक्ष्य करत त्यांच्यावर टिका केला.
मुख्यमंत्र्यांनी एखाद्या जिल्ह्याचे पालकत्व घेणे हे संकेताला सोडून आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तसे केले, पण हे करताना त्यांना या जिल्ह्याच्या विकासाऐवजी येथील लोहखनिज काढण्यासाठी मदत करायची होती. शक्तीपिठ महामार्गाचा राजहट्टही त्यासाठीच असून त्यांना येथील लोहखनिज गोव्यापर्यंत, आणि तेथून समुद्री मार्गे इतर देशात पाठवायचे आहे, असा आरोप प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केला.
भाजप त्याच्या मित्रपक्षांना गिळंकृत करण्याच्या मार्गावर असून 2029 किंवा त्यापूर्वी निवडणूक झाल्यास दोन्ही मित्रपक्ष भाजपसोबत दिसणार नाहीत, असा दावा यावेळी सपकाळ यांनी केला.
आ.विजय वडेट्टीवार यांनी आ.धर्मरावबाबा आत्राम यांना टार्गेट करत त्यांच्यावर टिका केली. अहेरीचे राजा कोणाच्या भरवशावर छाती फुगवतात हे माहित असल्याचे ते म्हणाले. दगडाचा आणि लोखंडाचा पैसा भारी झाला असेल तर कुठून काढता येतो आम्हाला माहित आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी सरकार उद्योगाच्या नावावर या जिल्ह्यातील स्थानिकांना उद्ध्वस्त करत असल्याची टिका केली.
































