गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेसोबत जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वातावरण निर्मितीचा एक भाग म्हणून काँग्रेसने गडचिरोलीत सोमवारी कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा घेतला. यात शहराचे प्रथम नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश सावकार पोरेड्डीवार आणि त्यांच्या पत्नी कविता पोरेड्डीवार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

भरगच्च उपस्थितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस विधिमंडळ गटनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थित गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी, आरमोरी क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सचिव संदेश सिंगलकर, प्रदेश सचिव शकूर नागाणी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, प्रदेश सचिव संतोषसिंह रावत, प्रदेश सचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.राम मेश्राम, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅड.विश्वजित कोवासे, समसेरखान पठाण, तसेच इतर पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, सेलचे अध्यक्ष व मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी माजी न.प. सभापती विजय गोरडवार, माजी जि.प.अध्यक्ष हर्षलता येलमुले, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड.लालसु नोगोटी, शिवसेनेचे गजानन नैताम यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, त्यांचे सहकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
































