गडचिरोली : महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरील गोदावरील नदीवर तेलंगणा सरकारने उभारलेल्या मेडीगड्डा धरणामुळे यावर्षीही गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्याला फटका बसत आहे. या धरणाचे सर्वच्या सर्व ८५ दरवाजे उघडण्यात आल्यामुळे वेगाने विसर्ग होणारे पाणी नदीच्या काठावरील शेतजमीन खरडून काढत आहे. हे पाणी नदीचे पात्र सोडून लगतच्या शेतांमध्ये शिरत आहे. एवढेच नाही तर काही गावांमध्येही पाणी शिरण्याची शक्यता असल्याने तेथून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ३३४ लोकांना आश्रयगृहांमध्ये हलविण्यात आले होते.
गुरूवारच्या जोरदार पावसानंतर गोदावरी नदीला जाऊन मिळणाऱ्या प्राणहिता आणि इंद्रावती नद्याही फुगल्या आहेत. मेडीगड्डा धरणामुळे या नद्यांचे बॅकवॅाटर शेतासोबत गावात शिरण्याची शक्यता आहे. शिवाय धरणातून सोडले जाणारे पाणी धरणाच्या खालील भागातील सिरोंचा तालुक्यातल्या गावांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे त्या भागातील १५ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेलंगणाच्या सीमावर्ती भागात तेलगू भाषेतून नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत. आतापर्यंत ३३४ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्या ठिकाणी त्यांच्या नास्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुरामुळे १५ मार्गांवरील वाहतूक बंद असून सिरोंचा तालुक्यातील शाळा-महाविद्यालय तथा अंगणवाड्यांना दि.२८ आणि २९ जुलै असे दोन दिवस जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सुटी जाहीर केली आहे.