गडचिरोली : राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता केंद्र व राज्य सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी विभाग तयार केला, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. मात्र या विभागाच्या इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळांमध्ये केजी, पहिल्या वर्गापासून ते पोस्ट ग्रॅज्युएट (पी.जी.) पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून देण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी विधानसभेत लक्षवेधीवरील चर्चेत केली.
यावेळी डॅा.होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यात सुरू असणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळांमध्ये एकही कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने कंत्राटी शिक्षकांच्या भरवशावर ती शाळा सुरू आहे. त्यामुळे या शाळांमध्ये कायमस्वरूपी शिक्षक कधी भरणार? असाही प्रश्न त्यांनी राज्य सरकारला केला. त्यावर उत्तर देताना आदिवासी विकास मंत्र्यांनी इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळांमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येईल, असेही उत्तर दिले.