सिरोंचा : स्वतःच्या घरी रात्री झोपलेली असताना कोणीतरी येऊन तरुणीच्या गळ्यावर धारदार शस्र चालवून तिचा खून करून जाते, पण घराच्या आवारात झोपलेल्या तरुणीच्या आई आणि भावाला कानोकान खबर मिळत नाही, असा प्रकार गेल्या १४ जुलै रोजी सिरोंचा तालुक्यातील रंगयापल्ली या गावात घडला होता. गुंतागुंतीच्या या प्रकरणात सिरोंचा पोलिसांनी तब्बल ८० लोकांची चौकशी केल्यानंतर खऱ्या आरोपीला शोधून काढले. तिचा मारेकरी दुसरा-तिसरा कोणी नसून तिचा मामेभाऊच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने ५ आॅगस्टपर्यंत पीसीआर दिला आहे.
ओलिता रामया सोयम (१९, रा.रंगयापल्ली) या युवतीच्या अशा रहस्यमय खुनाची घटना सकाळी झोपेतून उठल्यानंतरच तिचा भाऊ बुचया रामया सोयम (२८) याला समजली होती. पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या शिताफीने तपास करत अखेर १ ऑगस्ट रोजी ओलिताचा विवाहित मामेभाऊ स्वामी मलय्या आत्राम (३५, रा.रंगयापल्ली) याला अटक केली. या तपास कामात पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांना उपनिरीक्षक शीतल धविले, दिनेश कोळी, हवालदार राजू चव्हाण, शिपाई बाजीराव मुंडे, शत्रुघ्न भोसले, सुनील घुगे, प्रकाश मोरे, राकेश नागुला यांनी सहकार्य केले.
काय आहे खुनाचे नेमके कारण?
मृत ओलिता हिची तिचा मामेभाऊ स्वामी आत्राम याच्या पत्नीसोबत घट्ट मैत्री होती. दोघी रोजंदारीने सोबतच कामाला जात होत्या. ओलिता ही चंचल स्वभावाची असल्यामुळे आपल्या पत्नीने तिच्याशी मैत्री ठेवू नये असे त्याला वाटत होते. तो आपल्या पत्नीवर संशयही घेत होता. त्याला दारू पिण्याची सवय असून दोन मुलेही आहेत. दोघींची घरे जवळजवळ असल्याने एकमेकींकडे जाणे असायचे. यातच घटनेच्या दरम्यान ओलिताचा फोन त्याच्या पत्नीने वापरण्यासाठी घेतला होता. त्यावरूनही दोघांमध्ये वाद झाला होता. ओलिताच्या घरी जाऊन तिच्या आईलाही स्वामीने आमच्या घरी ओलिताला येऊ देऊ नका, असे बजावले होते. दरम्यान १२ जुलै रोजी स्वामीच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता. त्यानिमित्त ओलिता दोन दिवस स्वामीच्या घरी होती. बजावल्यानंतरही ती आपल्या घरी राहिल्यामुळे त्याचा राग अनावर झाला. त्याने या मुद्द्यावरून पत्नीशी वाद घातला. डोक्यात राग भरलेला असताना रात्री तो ओलिताच्या घरी गेला. दरवाजा फक्त लोटलेला होता. तो ढकलून तो आत शिरला व झोपेत असलेल्या ओलितावर चाकूने वार करुन पुन्हा स्वत:च्या घरी येऊन झोपी गेला. त्याच्या डोक्यातील संशयामुळे ओलिताचा तर जीव गेलाच, पण त्याच्यावर जेलची हवा खाण्याची वेळ आली.