गडचिरोली : कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी यांच्यासोबत सामान्य नागरिकांसाठी कुरखेडा तहसील कार्यालयाने उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण असे मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले आहे. यामुळे शासनाचे उपक्रम, योजनांच्या माहितीसोबत हवामान विभागाच्या सूचनाही मोबाईलवर मिळणार आहेत. असे अॅप्लिकेशन तयार करणारे कुरखेडा हे राज्यातील पहिले तहसील कार्यालय ठरले आहे.
कार्यालयीन वापरात हे अॅप्लिकेशन सर्व तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडून माहितीचे संकलन करणे, एकमेकांशी संवाद साधने, कर्मचारी/अधिकारी यांची माहिती तसेच कार्यालयीन महत्वाचे संदेश पुशअप नोटिफिकेशन्सद्वारे पाठविण्यासाठी होतो, असे तहसीलदार कुरखेडा यांनी कळविले आहे.
हे नाविन्यपूर्ण अँप नागरिक केंद्रित असून प्रगतीशिल प्रशासनाला मूर्त रूप देणारे व्यासपीठ म्हणून हे अॅप समुदायाच्या सुधारणेसाठी डिजीटल परिवर्तन स्वीकारण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल आहे. नागरिकांना कार्यक्षम आणि पारदर्शक सार्वजनिक सेवा देण्यासाठी कुरखेडा तहसील कार्यालयाची असलेली बांधिलकी हे अँप विकसित करण्यातून दिसून येते, अशी भावना जिल्हाधिकारी संजय मीना यांनी व्यक्त केली.