उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यावर्षी मिळणार पुरस्कार

जिल्हा प्रशासनाकडून समितीचे गठण

गडचिरोली : राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार येत्या 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार दिले जाणार आहे. त्यासाठी निवड करण्याची कार्यपद्धत शासन निर्णयान्वये निश्चित केलेली असून जिल्हास्तरीय निवड समितीचेही गठण करण्यात आले आहे

जिल्हास्तरीय समितीत निवासी उपजिल्हाधिकारी हे अध्यक्ष राहणार असून सदस्यांमध्ये शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक हे सदस्य तर जिल्हा नियोजन अधिकारी हे सदस्य सचिव असतील.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संबंधित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शासन निर्णयातील विहित नमुन्यात अर्ज पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या ईमेलवर 10 जुलै ते 5 सप्टेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन सादर करायचे आहेत. त्यांच्याकडून ते अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविले जातील.

सदर स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय समिती गडचिरोली यांनी कळविले आहे.