Home दैनंदिन बातम्या सेमाना देवस्थानात ‘ग्रीन वारियर’ व युवा क्लबतर्फे स्वच्छता अभियान

सेमाना देवस्थानात ‘ग्रीन वारियर’ व युवा क्लबतर्फे स्वच्छता अभियान

जागतिक महिला दिनाचे औचित्य

गडचिरोली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सेमाना देवस्थान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रीन वारियर आणि युवा क्लब यांच्या संयुक्त पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबवून परिसरातील कचरा हटवून देवस्थान परिसर स्वच्छ करण्यात आला.

सेमाना देवस्थान हे जिल्ह्यातील मुख्य धार्मिक स्थळांपैकी एक असल्याने येथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरात निर्माण होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला. या मोहिमेत सहभागी झालेल्या स्वच्छतामित्रांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले.

या स्वच्छता अभियानाप्रसंगी नगर परिषद पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर म्हणाले, “केवळ शासन किंवा प्रशासनावर विसंबून न राहता, तरुणांनी स्वतःहून स्वच्छतेसाठी पुढे येणे ही काळाची गरज आहे. ग्रीन वारियर आणि युवा क्लबने महिला दिनाचे औचित्य साधून दिलेला हा संदेश कौतुकास्पद आहे.”

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बोरकुटे म्हणाले, “धार्मिक स्थळे ही आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत. ती स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या युवकांच्या कार्यामुळे सेमाना परिसराला नवे रूप मिळाले आहे.”

डॉ.दीप बोदेले यांनी “आजच्या काळात पर्यावरणाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. ‘स्वच्छ गडचिरोली, सुंदर गडचिरोली’ हे स्वप्न अशाच उपक्रमांतून साकार होईल” असा आशावाद व्यक्त केला.