जंगली हत्ती पोहोचले शिवणी-मोहझरीच्या वेशीवर, गावकऱ्यांचा जीव टांगणीला

उराडीच्या ग्रामसभेत हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी

आरमोरी : कुरखेडा तालुक्यात धुमाकूळ घातल्यानंतर जंगली हत्तीच्या कळपाने आपला मोर्चा आरमोरी तालुक्याकडे वळविला आहे. हे हत्ती शिवणी, मोहझरी गावाच्या वेशीलगत दाखल झाल्याने वनविभागासह सनियंत्रण पथक सतर्क झाले आहे. दरम्यान उराडी येथील ग्रामसभेने मंगळवारी तातडीची बैठक घेऊन सदर हस्तींचा बंदोबस्त करावा, त्यांना गाव, शेतशिवारातून हुसकावून लावावे अशी मागणी केली आहे.

मंगळवारी रात्री या कळपाने देलनवाडी वनपरिक्षेत्रातील शिवणी-मोहझरी लगतच्या जंगलात प्रवेश केला. याबाबत माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहर हत्ती सनियंत्रण पथक घेऊन दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करून हत्तींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

दरम्यान उराडीतील गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन हत्तींना हुसकावून लावण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेन्द्रसिंह चंदेल हेसुद्धा उपस्थित होते. रात्रीच्या सुमारास हे हत्ती जंगलातून निघून शेतात किंवा गावात शिरतात आणि नासाडी करतात. हत्तींनी पिकांचे नुकसान करू नये यासाठी सनियंत्रण पथकाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी सुरेंद्रसिंह चंदेल यांनी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक चव्हान यांना फोनवरून केली. त्यांनी आम्ही लगेच टीमला तिकडे पाठवतो असे सांगितले. दरम्यान हत्तींचा योग्य बंदोबस्त केला नाही तर वडसा डीएफओ कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा सुरेन्द्रसिंह चंदेल यांनी दिला.