ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत आदिम जमातीच्या विकास कामांसाठी निधी द्या

भाजपा जिल्हाध्यक्ष वाघरे यांचे ना.गावित यांना निवेदन

गडचिरोली : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त आणि आकांक्षित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आदिम जमातीचे लोक अतिदुर्गम भागामध्ये राहतात. त्यांना सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत, आदिम जमाती विकास कार्यक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

वाघरे यांनी निवेदनात नमूद केल्यानुसार, जिल्ह्यातून गोदावरी, वैनगंगा अशा मोठ्या नद्या वाहात असल्यामुळे नदीच्या काठावरील गावांना पावसाळ्यात पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतो. यात त्यांचे दरवर्षी बरेच नुकसान होते. अनेक वेळा घराबाहेर राहावे लागते. गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागामध्ये घर, रस्ते, नाल्या यासंदर्भात अनेक समस्या येत असतात. विपरित भौगोलिक परिस्थिती आणि नक्षल समस्येने ग्रासलेल्या या जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठी सढळ हाताने निधी देण्याची मागणी वाघरे यांनी केली.

ना.विजयकुमार गावित यांनी त्यावर सकारात्मक उत्तर देऊन गडचिरोली जिल्ह्याला ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत आदिवासी समाज व आदिम जमातीच्या विकासासाठी लवकरात लवकर मोठा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. जिल्ह्यातील विविध विकास कामांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.