Home दैनंदिन बातम्या स्वर्गरथाच्या दुरूस्तीवर न.प.चा तब्बल 9.63 लाखांचा खर्च !

स्वर्गरथाच्या दुरूस्तीवर न.प.चा तब्बल 9.63 लाखांचा खर्च !

खर्चाची चौकशी करण्याची मागणी

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेत निवडणुकीपूर्वीच्या चार वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळातील कामकाजावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या काळात अनेक कामांमध्ये अनियमितता झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. त्यापैकीच एक म्हणजे स्वर्गरथाच्या दुरुस्तीसाठी केलेला 9.63 लाखांचा खर्च संशयाच्या घेऱ्यात सापडला आहे. याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक श्रीकांत देशमुख यांनी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, नगर परिषदेच्या स्वर्गरथाच्या दुरूस्ती आणि मॅाडिफिकेशनसाठी तब्बल 9.63 लाखांचा खर्च करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाहनाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी एवढी मोठी रक्कम खर्च करणे म्हणजे ‘मलिदा’ लाटण्याचा प्रकार नाही का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. दुरुस्तीसाठी एवढा खर्च होत असेल, तर त्याऐवजी नवीन वाहन खरेदी करणे अधिक फायद्याचे ठरले नसते का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्वर्गरथाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. पालिका प्रशासनाकडून ही सेवा उपलब्ध करून दिली जात असली तरी, वाहनाच्या एकूण किमतीच्या 50 ते 75 टक्के रक्कम जर केवळ दुरुस्तीवर खर्च होत असेल, तर त्या निर्णयाच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

दरम्यान, एवढ्या मोठ्या खर्चासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया (टेंडर) राबविण्यात आली होती का? याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात काँग्रेसच्या एका नगरसेवकांनी संपूर्ण खर्चाची माहिती मागविली असून, कोणत्या बाबींवर किती रक्कम खर्च झाली याची सविस्तर आकडेवारी लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय कार्यकाळात आणखी किती कामांमध्ये अनियमितता झाली, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

खर्च संशयास्पद; चौकशी करा – देशमुख

नगरसेवक श्रीकांत शरदराव देशमुख यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देताना “शहरासाठी स्वर्गरथाची गरज निश्चित आहे; मात्र दुरुस्तीवर झालेला खर्च अव्वाच्या सव्वा आहे. या खर्चात थोडी भर घातली असती, तर नवीन वाहन खरेदी करता आले असते. त्यामुळे हा खर्च संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,” अशी मागणी केली आहे.