गडचिरोली : काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या धानोरा तालुक्यात काँग्रेसला खिंडार पाडत नगर पंचायतच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यात भाजपला यश आले. धानोरा नगरपंचायतचे काँग्रेसचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 9 नगरसेवकांनी शनिवारी (दि.25) नागपूर येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आ.डॅा.नामदेव उसेंडी, माजी आ.डॅा.देवराव होळी, प्रकाश गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
भाजपमध्ये दाखल झालेले हे पदाधिकारी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र सध्या केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे नगर पंचायतींमधील विकास कामांसाठी निधी मिळण्यात अडचणी जात होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांनी भाजपशी घरोबा करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
न.पं.उपाध्यक्ष ललित बरछा यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपला जवळ केले. या घडामोडींमुळे धानोरा तालुक्यात काँग्रेसची ताकद कमी होऊन भाजपला बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत धानोरा तालुक्यातून काँग्रेसला आघाडी होती हे विशेष. आता येणार्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपला या तालुक्यातून ताकद मिळणार आहे.
































