जिल्ह्यात रेल्वेसोबत विमान सेवा सुरू करण्यासाठी शासनाकडून पुढाकार

स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ना.आत्राम यांची माहिती

गडचिरोली : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा निर्मितीपासून वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य याबाबत अमुलाग्र बदल झाले आहेत. जिल्ल्ह्यात दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा अजून चांगल्या प्रकारे कशा देता येतील, याबाबत प्रशासन काम करीत आहे. तसेच रेल्वेसोबत विमान सेवा सुरू करण्यासाठी शासनाकडून काम सुरू असल्याचे, यावेळी ना.आत्राम यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी आ.डॅा.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मिना, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, राजकीय नेते, विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

खनिज आणि नैसर्गिक साधनसंपत्ती विपूल प्रमाणात असलेल्या गडचिरोली जिल्ह्याकडे विकासाच्या बाबतीत शासनाचे विशेष लक्ष आहे. यामध्ये आरोग्य, रस्ते, पूल तसेच रोजगारविषयक कामांना प्राधान्य दिले जात आहे. अर्थव्यवस्था बळकट करून जिल्ह्यातील युवकांना जिल्हयातच काम मिळवून देणे शासनाचे महत्त्वाचे उद्दीष्ट असणार आहे. रोजगार वाढवून जिल्हयातील प्रत्येक नागरिकाला विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे ना.आत्राम म्हणाले.

शासनाचा अभिनव उपक्रम असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील 6 लक्ष 97 हजार 613 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. या उपक्रमात लोकसंख्येच्या तुलनेत विविध योजनांचा सर्वाधिक लाभ देणारा गडचिरोली हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. भारतमाला राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत गडचिरोली ते दुर्ग हा प्रस्तावित चौपदरी रस्ता जिल्ह्यातील 5 तालुके आणि 58 गावांतून जाणार आहे. या रस्त्याची गडचिरोली जिल्ह्यात एकूण लांबी 70.15 किमी असल्याचे ते म्हणाले.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा, तसेच कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला.