जिल्ह्यातील ९३९ पोलीस झाले हवालदार, तर ३८५ हवालदार झाले एएसआय

८७ होमगार्ड जवानांनाही पदोन्नती

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलात नाईक पदावर कार्यरत असलेल्या ५५४ पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार या पदावर तर पोलीस हवालदार पदावर कार्यरत असलेल्या ३८५ अंमलदारांना सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नेमणुकीच्या ठिकाणी असताना उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल त्यांना ही पदोन्नती देण्यात आली. याशिवाय गेल्या १० वर्षांपासून रखडलेली होमगार्डस् ची पदोन्नतीही मार्गी लावत ८७ होमगार्ड जवानांना पदोन्नत करण्यात आले. होमगार्ड महासमादेशकांच्या आदेशान्वये जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी यासाठी पुढाकार घेतला. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या होमगार्डच्या जवानांसाठी ही मोठी भेट ठरली आहे.