Home क्राईम अंमली पदार्थ आणि दारूच्या नशेत दोन अल्पवयीन मुलांनी केली हत्या!

अंमली पदार्थ आणि दारूच्या नशेत दोन अल्पवयीन मुलांनी केली हत्या!

'त्या' तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले

गडचिरोली : चामोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघोली शिवारात झालेल्या अनोळखी तरुणाच्या खुनाचा 48 तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. नंदकिशोर मोतीलाल मिश्रा उर्फ बंटी (33 वर्ष) असे त्या युवकाचे नाव आहे. मूल येथील रहिवासी असलेल्या त्या युवकाची दोन अल्पवयीन मुलांनी अंमली पदार्थाच्या आणि दारूच्या नशेत हत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्या दोन्ही मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चामोर्शी ते मूल मार्गावरील वाघोली शिवारात एका अनोळखी युवकाचा मृतदेह मिळून आल्याच्या तक्रारीवरून दि.8 च्या सकाळी चामोर्शी पोलिसांनी कलम 103 (1) भा.न्या.सं 2023 अन्वये गुन्हा नोंद केला होता. अनोळखी मृतकाची ओळख पटवून आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृत युवकाच्या अंगावर ओळख पटविण्यासाठी कोणतीही वस्तू किंवा खूण मिळून न आल्याने ओळख पटविण्याकरीता पोलिसांनी विविध माध्यमातून तपास सुरु केला.

सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी घटनास्थळी भेट दिली, तर अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी यांनी चामोर्शी ठाण्यात तपासाचा आढावा घेतला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिका­ऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या मागावर चामोर्शी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांची वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली.

तपास पथकांना दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिसांनी शेजारील जिल्ह्रातील पोलीस दलाशी समन्वय साधून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे केलेल्या तपासात मृतकाची ओळख पटविण्यात आली होती. ओळख पटताच तपास पथकांनी मृताचे कुटुंबिय, साक्षीदार तसेच इतर पुराव्यांच्या मदतीने संशयित आरोपींची चौकशी करत असताना दोन अल्पवयीन बालकांचा सदर गुन्ह्रात सहभाग असल्याची माहिती तपास पथकास मिळाली. यावरुन सदर संशयित अल्पवयीन बालकांना तपासाकरीता बोलावून त्यांना विश्वासात घेऊन गुन्ह्राच्या अनुषंगाने त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले.

अंमली पदार्थाच्या व्यवसायातून आरोपींशी ओळख

अधिक तपासादरम्यान असे दिसून आले की, मृतक नंदकिशोर मिश्रा ऊर्फ बंटी याच्याकडे अंमली पदार्थ मिळत असल्याची त्या अल्पवयीन मुलांना माहिती मिळाली होती. यावरुन दोघांनीही मृतक नंदकिशोर याच्याकडून अंमली पदार्थ घेतले. तसेच मद्य सेवन करण्यासाठी तिघेही दिनांक दि.7 सप्टेंबर 2026 रोजी घटनास्थळावर गेले होते. तिघांनीही अंमली पदार्थ आणि मद्याचे सेवन केल्यानंतर नशेत त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. ते भांडण वाढत गेले आणि नशेमध्ये असलेल्या दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांनी नंदकिशोर याचा रागाच्या भरात दगड व मोटारसायकलमध्ये असलेल्या टी-रॉडने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत नंदकिशोर यांना तसेच ठेवून त्या दोन्ही मुलांनी तेथून पळ काढला.

गोपनिय माहितीच्या आधारावर झाला उलगडा

सदर गुन्ह्रात कोणतेही पुरावे नसताना केवळ तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारावर मृतकाची ओळख पटवून गंभीर व क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना बाल न्याय मंडळ, गडचिरोली यांच्यासमक्ष हजर केले जाणार आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास चामोर्शी पो.स्टे.चे सपोनि.सुमेध बन्सोडे हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस अधीक्षक, गडचिरोली अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात पोस्टे चामोर्शीचे पोनि.महादेव ढाकणे, स्थागुशाचे पोनि.अरुण फेगडे, सपोनि.सुमेध बन्सोडे, पोउपनि.गणेश जंगले, पोउपनि.शाहू दंडे व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.