गडचिरोली : मराठा आरक्षणाचा जीआर काढत असाल तर गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्वीप्रमाणे १९ टक्के करणारा जीआर काढा, अशी मागणी शिवसेनेच्या (उबाठा) नेतृत्वात ओबीसी बांधवांनी बुधवारी (दि.५) आरमोरी तहसील कार्यालयावर धडक देऊन केली. यासंदर्भात देसाईगंजच्या उपविभागीय अधिकाऱ्यानंतर आरमोरी तहसीलदारांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली.
मराठा आरक्षणासंदर्भात जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनामुळे सरकार त्याबाबतचा जीआर काढण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून ६ टक्के करण्यात आले. हे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे यासाठी जिल्ह्यात अनेक दिवसांपासून ओबीसी बांधव मागणी करत आहेत. त्यासाठी आंदोलनेही झाली. पण सरकारने दखल घेतली नसल्यामुळे नोकरीत ओबीसी तरुण-तरुणींवर अन्याय होतो.
आता महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासोबत गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करून होत असलेला अन्याय दूर करावा अशी मागणी केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी चंदेल यांच्यासह उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, युवासेना जिल्हाध्यक्ष चंदू बेहरे, विधानसभा संघटक शेखर मने, तालुका प्रमुख भूषण सातव यांनी निवेदन सादर केले. यावेळी आरमोरी शहर प्रमुख तथा न.प. सभापती सागर मने, माजी महिला उपजिल्हा संघटीका वेणू ढवगाये, मेघा मने, उपतालुका प्रमुख लहानू पिल्लारे, विभाग प्रमुख राजू ढोरे, विजय मुरवतकर, नानेश्वर ढवगाये, नंदू खानदेशकर, धनंजय इनकने, पुरूषोतम कामतवार, सतीश गुरनोले, राजेंद्र मुठालकर, मुनेश मेश्राम, महिला आघाडीच्या आरमोरी महिला शहर प्रमुख सारिका कांबळे, विद्या अतकरे, राधा शेंडे, अनिल उईके, निकेश हेटकर आदी उपस्थित होते.