गडचिरोली : दारुबंदी असताना गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या छुप्या पद्धतीने दारुची आयात करून विक्रीही केली जाते. त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गस्त वाढविली. यात गडचिरोली पोलीस स्टेशनला तीन वर्षापूर्वी ठाणेदार म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या आणि सेवानिवृत्तीनंतर राजकीय पक्षात प्रवेश करणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्याच्या मुलांकडूनच दारूची तस्करी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दोन्ही मुलांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारच्या (दि.6) पहाटे गडचिरोली शहरातील अवैध दारु वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड यांच्यासह प्रशांत गरफडे, श्रीकृष्ण परचाके, श्रीकांत बोईना, चालक मनोहर तोगरवार यांनी नाकेबंदी केली होती. आकाश भरडकर वैनगंगा नदीपलिकडील मंडलवार यांच्या राज बारमधून सुमो वाहनातून दारूच्या पेट्या गडचिरोली शहरात आणत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्या आधारे मूल रोडवर शोध घेत असताना सदर संशयित वाहन सेमाना बायपास मार्गे पोटेगाव रोड व तेथून चातगावकडे पळून जात असल्याचे आढळले. त्यामुळे त्या वाहनाचा पाठलाग केला असता, वाहनात असलेले 2 अज्ञात इसम बोदली गावाच्या जवळ वाहन थांबवून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
वाहनाची तपासणी केली असता त्यात ३ लाख २४ हजार रुपयांची विदेशी दारू व बियर आढळली त्या मालासह वाहन असा एकूण 8 लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गडचिरोली पोलीस स्टेशनला आरोपी आकाश भरडकर याच्यासह माजी ठाणेदाराची मुले निखिल मंडलवार आणि निरज मंडलवार, आणि दोन अनोळखी इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या सहकलम 65 (अ), 83, 98 (2), भादंवि 353, 332 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.