झेंडेपारच्या लोहखाणींची लोकसुनावणी गावातच घ्या, अन्यथा न्यायालयात जाणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा

गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची तालुक्यात होऊ घातलेल्या प्रस्तावित झेंडेपार पाच लोहखाणींबाबत पर्यावरण विभागाने १० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसुनावणी ठेवली आहे. वास्तविक त्या भागातील लोकांच्या समस्या, भावना जाणून घ्यायच्या असतील तर त्या भागातच लोकसुनावणी घ्या, अन्यथा न्यायालयात दाद मागणार, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेसाठी गडचिरोलीत आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.

कोरची तालुक्यातील झेंडेपारच्या ४६.३७ हे.आर.क्षेत्रामध्ये लोहखनिज उत्खननासाठी ५ खाणपट्टे देण्यात आले आहेत. त्यात आर.एम.राजूरकर यांना ८ हेक्टरचे क्षेत्र, मे.अनुज माईन्स मिनरल्स अँड केमिकल प्रा.लि.यांना १२ हेक्टर, निर्मलचंद जैन यांना १०.३७ हेक्टर, अनोजकुमार अगरवाला यांना १२ हेक्टर, तर मनोजकुमार अजितसरिया यांना ४ हेक्टर खाण क्षेत्राची लिज देण्यात आली आहे. यामुळे कोरची, नांदळी, मसेली, नवरगाव, कोटरा, बोटेकसा, बिहटेकला, बेडगाव, जांभळी, आस्वल हुडकी, बेतकाठी, नवेझरी, बेलारगोंदी या ग्रामपंचायतींमधील गावे त्या खाण क्षेत्राच्या १० किलोमीटरच्या परिघात येतात. त्यामुळे त्या गावांमधील नागरिकांना या लोकसुनावणीत आपले म्हणणे मांडता येणार आहे. परंतू ही सुनावणी गडचिरोलीत घेऊ नये, असे मत पटोले यांनी व्यक्त केले.

पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आ.डॅा.नामदेव उसेंडी, माजी आ.आनंदराव गेडाम, प्रदेश सरचिटणीस व जिल्हा प्रभारी डॅा.नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सचिव डॅा.नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, किसान काँग्रेसचे वामन सावसावकडे, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मर्यादा वाढवूनच मराठ्यांना ओबीसी कोट्यात आरक्षण द्या

राज्यात ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न हा ओबीसींच्या तोंडचा घास हिरावण्यासारखे आहे. यामुळे ओबीसी समाजाच्या मनात पेटणाऱ्या आगीत भाजप होरपळेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मराठा किंवा धनगर समाजाला खरंच आरक्षण द्यायचे असेल तर पंतप्रधानांनी बोलविलेल्या विशेष अधिवेशनात ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवणारा कायदा करावा, असेही नाना पटोले म्हणाले.