गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील घरगुती वीज ग्राहकांनी वीज बिलापोटी ५ कोटी ६५ लाख रुपये महावितरण कंपनीला भरले नाही. त्यामुळे ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा वीज कंपनीने सुरू केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १९ हजार २४४ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. पण वीज पुरवठ्याअभावी राहू न शकल्याने त्यातील बहुतांश ग्राहकांनी बिलाचे पैसे भरून पुरवठा सुरू करून घेतला. ही वेळ बिल थकित असणाऱ्या कोणत्याही वीज ग्राहकावर येऊ शकते.
जिल्ह्यात आजच्या स्थितीत घरगुती वीज ग्राहकांकडे ५ कोटी ६५ लाख, तर वाणिज्यिक गाहकांकडे ८१ लाखाचे बिल थकित आहे. याशिवाय औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी ३ लाखांच्या बिलाची थकबाकी आहे. तसेच ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३८ लाख येणे बाकी आहेत.
जुलै २०२२ ते ऑगस्ट २०२३ या एक वर्षाच्या कालावधीत चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ४८ हजार ६१५ थकबाकीदारांची बत्ती गुल करण्यात आली. यात ३४ हजार ८६६ तात्पुरत्या स्वरुपात तर १३ हजार ७४९ थकबाकीदार ग्राहकांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. जुलै व ऑगस्ट २०२३ या दोनच महिन्यात ३ हजार १०३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. वीजेशिवाय राहता न आल्यामुळे १७ हजार ५८८ ग्राहकांनी पुनर्जोडणी शुल्क भरून वीजपुरवठा लगेच सुरू करून घेतला.
थकबाकीदारांविरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम राबविण्यात येत असून महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेऊन ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे.