कोरची तालुकावासियांसाठी आता कुरखेडातच दस्त नोंदणीची सोय

आ.कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश

गडचिरोली : कोरची तालुक्यातील नागरिकांना विविध प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी ७० ते ७५ किलोमीटरचे अंतर कापून आरमोरीला येण्याची गरज आता पडणार नाही. कारण या तालुक्याला दस्त नोंदणीसाठी लगतच्या कुरखेडा येथे जोडण्यात येणार आहे. आ.कृष्णा गजबे यांच्या मागणीवरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही सुविधा दिली आहे. त्यामुळे कोरची तालुक्यातील नागरिकांचे श्रम, वेळ आणि पैसे वाचणार आहेत.

यासंदर्भात आ.गजबे यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन कोरची तालुक्याची भौगोलिक परिस्थिती आणि त्यामुळे आरमोरीला येणे त्यांच्यासाठी कसे अडचणीचे आहे हे समजावून सांगितले होते. त्यानुसार महसूल विभागाचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांनी राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांना तसे लेखी निर्देश दिले. त्यामुळे कोरचीवासियांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे.