गडचिरोली : केंद्र शासनाच्या आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धती (HMIS) पोर्टलच्या गुणांकन प्रकियेत गडचिरोली जिल्ह्याने राज्यात प्रथम पटकावला आहे.
राज्यात आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. इतर जिल्हयांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात खासगी वैद्यकीय व्यवसायिक, तसेच स्पेशालिस्टची कमतरता आहे. अशात उपलब्ध आरोग्य सेवेतून गडचिरोली जिल्हयातील नागरीकांना शासकीय विभागाकडून आरोग्य सेवेचा लाभ दिला जात आहे.
जिल्हाधिकारी संजय मीना, सीईो आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अतिदुर्गम, डोंगराळ भागामधील नागरिकांना आरोग्य सेवेचा, तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याकरिता प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे यांनी सांगितले.
या आरोग्य सेवांची दिली अद्यावत माहिती
आरोग्य विभागामार्फत आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धती (HMIS) या केन्द्र शासनाच्या पोर्टलवर शहरी व ग्रामिण भागात देत असलेल्या सेवांबाबत माहिती दर महिन्याला अद्यावत केली जाते. या पोर्टलमध्ये ६३ प्रकारच्या आरोग्यविषयक सेवांचा समावेश केला आहे. त्यात प्रामुख्याने गरोदर मातांची नोदणी, बालकांचा समावेश केलेले लसीकरण, किशोरवयीन मुलींना आरोग्य शिक्षण, गरोदर मातांची विविध प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या, मातेला गरोदरपणात देण्यात आलेला औषधपोचार, गर्भनिरोधक साधनांचा वापर, संस्थेतील प्रसुतीबाबत माहिती पोर्टलवर अद्यावत केली जाते. राज्यस्तरावर पोर्टलवर या निर्देशांकाचे मुल्यमापन करुन राज्यातील जिल्हानिहाय गुणांकन केल्या जाते. त्यानुसार गडचिरोली जिल्हयाला सर्वाधिक गुण मिळाले.
जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.स्वप्निल बेले, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मशाखेत्री, जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्याकडून सततचा पाठपुरावा, त्याचप्रमाणे जिल्हास्तर व तालुकास्तरावरील विविध प्रशिक्षण बैठकींचे आयोजन, तसेच ग्रामिण भागातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी, आशा, गटपर्वतक यांच्या माध्यमातून हे शक्य झाले असल्याचे डॉ.दावल साळवे यांनी सांगितले.