वाजतगाजत जिल्हाभर गणरायाचे आगमन गडचिरोली न.प.देणार मंडळांना बक्षिस

पर्यावरणपुरक उत्सवासाठी प्रशासनाचा पुढाकार

गडचिरोली : गणेश चतुर्थीच्या पर्यावर मंगळवारी जिल्हाभरात १० दिवसीय गणेशोत्सवाला सुरूवात झाली. जिल्हाभरात दोन हजारांवर सार्वजनिक गणेश मंडळांनी वाजतगाजत श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. याशिवाय अनेक घरांमध्ये छोट्या मूर्तीच्या रूपात गणरायाचे आगमन झाले. दरम्यान पर्यावरणपुरक गणेश उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना गडचिरोली नगर परिषदेकडून बक्षिसाचे प्रयोजन करण्यात आले आहे.

माझी वंसुधरा अभियान तथा स्वच्छता पंधरवडा उपक्रमाअंतर्गत गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने सामाजिक उपक्रमांसह पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विविध सामाजिक उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर, आभा हेल्थ कार्ड योजना, पी.एम. स्वनिधी योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान यासंदर्भात माहिती, दिव्यांग नाव नोंदणी इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

पर्यावरणपुरक गणेशोत्सवाअंतर्गत सार्वजनिक मंडळांची गणेश मुर्ती शाडूच्या किंवा मातीच्या वापराव्या, मंडळाचा परिसर स्वच्छ ठेवावा, निर्माल्यासाठी कापडी पिशवी किंवा निर्माल्य कलशाचा वापर करावा, सजावटीसाठी कागदी मखराचा वापर करावा. प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर टाळावा, मंडपाची जागा रहदारीस अडथळा न येता कमीत कमी जागा व्यापक असावी, ध्वनिप्रदुषन टाळावे, पर्यावरण संर्वधनाला चालना देणारे देखावे असावे. मंडळ परिसरात तथा विसर्जनाचे दिवशी शांतता व सलोखा ठेवावा असे निकष ठेवण्यात आले आहे.

नगर परिषदेच्या तपासणी चमुमार्फत सर्व्हेक्षण करून सर्वोत्कृष्ठ तीन सार्वजनिक गणेश मंडळांना प्रथम बक्षिस २५००० रुपये, व्दितिय १५००० रुपये व तृतिय १०००० रुपये रोख स्वरुपात नगर परिषद, गडचिरोलीमार्फत प्रदान करण्यात येणार आहे. घरगुती गणेश मुर्ती विर्सजनाकरिता नगर परिषदेतर्फे कृत्रीम तलाव उपलब्ध करुन दिले जाईल, तथा वरील नमुद पर्यावरणपुरक निकष पाळणाऱ्या घरगुती मुर्तींना नगर परिषदेतर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल, असे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी कळविले.

अहेरीच्या राजवाड्यात गणरायाचे आगमन

गणेशोत्सवानिमित्त अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाडा निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली. यावेळी सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभू दे, अशी प्रार्थना धर्मरावबाबा यांनी केली. याप्रसंगी घरातील सर्व सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजवाड्यात दरवर्षी गणेशोत्सव, दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.