सलग आठव्यांदा जिल्हा सहकारी बँकेने पटकावला बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार

५ ऑक्टोबरला दमण येथे सन्मान सोहळा

गडचिरोली : शिस्तप्रिय कारभारासाठी राज्यभर ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुन्हा एकदा २०२२-२३ या वर्षाचा बँको ब्ल्यू रिबन हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाला आहे. देशभरातील ३७० बँकांमधून गडचिरोली जिल्हा बँकेची सलग आठव्यांदा या पुरस्कारासाठी निवड झाली हे विशेष.

तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या श्रेणीत ठेव वृद्धी, तसेच रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या आर्थिक निकषानुसार या पुरस्कारासाठी निवड केली जाते. येत्या ५ ऑक्टोबरला दमण येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात यशस्वीपणे आणि योग्य पद्धतीने बँकिंग सेवा दिल्यामुळे आतापर्यंत या बँकेने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. बँकेने ३१ मार्च २०२३ च्या आर्थिक स्थितीनुसार ३ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे.

बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार आणि संचालकांनी या पुरस्काराचे श्रेय ठेवीदार आणि सभासदांना दिले.