गोंडवानाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार डॅा.सतीश गोगुलवार यांना प्रदान

विद्यापीठाला सर्वतोपरी सहकार्य- जिल्हाधिकारी

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाकडून दरवर्षी २ ऑक्टोबरला विद्यापीठाच्या वर्धापन दिनी दिला जाणारा जीवनसाधना गौरव पुरस्कार यावर्षी सामाजिक कार्यकर्ते डॅा.सतीश गोगुलवार यांना देण्यात आला. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रात आरोग्यविषयक समस्यांबाबत डॉ.सतीश गोगुलवार आणि डॅा.शुभदा देशमुख हे दाम्पत्य जनजागृती करतात. या कार्यक्रमासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि ना.धर्मरावबाबा आत्राम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. पण दादा आणि बाबांची अनुपस्थिती अनेकांना खटकल्याचे दिसले.

जिल्हाधिकारी संजय मीना, कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे, आ.डॅा.देवराव होळी यांच्या उपस्थितीत डॅा.गोगुलवार दाम्पत्याचा यावेळी सत्कार करण्यात आला. याशिवाय विद्यापीठाशी संबंधित उत्कृष्ट महाविद्यालय, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॅा.श्रीराम कावळे, कुलसचिव अनिल हिरेखण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आधुनिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिक्षण प्रणालीनुसार नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे विद्यार्थी घडतील अशी आशा यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे विद्यापीठाने कात टाकली असून भविष्यातील विविध उपक्रमांसाठी माझे सर्व सहकार्य असेल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

या विद्यापीठातून डॅाक्टरेट करण्याची आपली ईच्छा होती. पण त्यासाठी लागणारा कालावधी पाहता मी तोपर्यंत इथे राहू शकणार नाही हा विचार करून तो विचार सोडून दिल्याचे यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले.