गुरवळाच्या महिला सरपंचाला भोवला मनमानी कारभार, झाल्या पायउतार

६ विरूद्ध १ मतांनी अविश्वास ठराव पारित

गडचिरोली : तालुक्यातील मौजा गुरवळा येथील सरपंच दर्शना धनराज भोपये यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव ६ विरूद्ध १ अशा मतांनी पारित झाला. त्यामुळे त्यांना सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागले.

शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत पॅनलने गुरवळा ग्रामपंचायतीवर आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दर्शना धनराज भोपये सरपंच झाल्या होत्या. मात्र त्यांना मिळालेल्या संधीचा उपयोग गावाच्या विकासासाठी न करता भाजप व काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या काही ठेकेदारांशी संगनमत करून मनमानी पद्धतीने कारभार चालविला होता, असा आरोप करत सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला होता. तहसीलदारांनी मंगळवार, दि.३ रोजी यासंदर्भात चर्चेसाठी सभा बोलविली होती. त्यात दर्शना भोपये यांच्याविरूद्ध बहुमताने ठराव पारित झाला.

अविश्वास प्रस्ताव टाळण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांवर दबावसुद्धा आणण्याचा प्रयत्न झाला, पण सदस्यांनी प्रतिसाद दिला नाही. प्रकाश बांबोळे, चंद्रकांत भोयर, विलास अडेंगवार, जया मंकटवार, छाया बांबोळे, निशा आयतूलवार या सहाही ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले.